Monday, August 7, 2017

सापांची गोष्ट

एका गावात एक मुलगा राहत होता. त्याचे नाव होतं गौतम. गौतम सगळ्यांशी खूप छान वागायचा. आई-बाबांना मदत करायचा. भरपूर खेळायचा आणि भरपूर अभ्यास पण करायचा. 

गौतमला प्राण्यांशी खेळायला खूप आवडायचं. तो सगळ्या प्राण्यांचे लाड करायचा, त्यांना खायला द्यायचा. कोणाला लागलं असेल तर दवा-पाणी करायचा. 

गम्मत म्हणजे गौतमला सर्व प्राण्यांची भाषा समजायची. त्याला त्यांच्याशी बोलायला खूप मज्जा यायची. 

एके दिवशी तो त्यांच्या घराच्या मागच्या बागेत खेळात होता, तेव्हा त्याला दोघांचे बोलण्याचा आवाज आला. 

"...आणि तो मला नुसता बघूनच पळून गेला."

"किती भितात ही माणसं आपल्याला!"

"हो ना. आपण तर विषारी पण नाहीयोत. खरं तर आपण माणसांना मदतच करतो."

"तर काय! आपण शेतातले उंदीर खातो. घरातल्या आजूबाजूचे उंदीर, घुशी खातो. त्यामुळे माणसांचं धान्यांचे नुकसान वाचते."

"आणि तरीही लोकं आपल्याला घाबरतात."

गौतमला लक्षात आला की हा संवाद दोन सापांमध्ये चालू आहे. तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, "खरं बोलताय तुम्ही दोघं. आम्ही माणसं उगाच घाबरतो तुम्हाला. मी तुमचा दोस्त बनेन आणि सगळ्यांना तुमच्या बद्दल सांगेन."

दोघेही साप happy झाले आणि गौतमला मदत करायला कबूल झाले. 

गौतम गावामध्ये सर्वांना शिकवायला लागला की साप कसे आपले मित्र आहेत, कसे विषारी आणि बिनविषारी साप ओळखायचे, साप चावला तर काय करायचे. हळू हळू लोकांना पटू लागले की  सगळेच साप विषारी नसतात व सापांचा आपल्याला किती उपयोग होतो ते.

एक दिवस पहाटे गणू अण्णा त्यांच्या शेतातून परत येत होते तेव्हा पाय घसरून पडक्या विहिरीत पडले. पाणी जास्त नव्हतं, पण खोल होती विहीर. अडकून राहिले बराच वेळ. गणू अण्णा घाबरून बसले होते. कारण त्यांना सारखा सापांचा आवाज ऐकू येत होता. 

उजाडत आलं तसं गणू अण्णांना विहिरीबाहेर चाहूल जाणवू लागली. त्यांनी एक-दोन हाका मारल्या, "कोणी आहे का? मला कोणी तरी बाहेर काढा."

नेमका गौतम तेथून जात होता. त्याने आवाज ऐकला. त्याने विहिरीच्या आत बघितलं. "अर्रे गणू अण्णा, तुम्ही ह्या पडक्या विहिरीत काय करताय?"

"गौतम का? मी मगाशी शेतावरून घरी जात होतो. पाय घसरून पडलो. माझ्या पायाला लागलाय. मला चढता येत नाहीये. आणि एव्हडे साप आहेत इथे. मला जाम भीती वाटत आहे. मला कृपाकरुन बाहेर काढ इथून."

"अहो अण्णा, सापांना का घाबरताय? नका घाबरू! ते काही नाही करत!"

तेव्हड्यात गौतमला सापांचे बोलणे ऐकू आले! "थांबा, थांबा, गणू अण्णा. साप काहीतरी सांगतायत."

"अरे गौतम, आम्ही कधी पासून त्यांना आवाज देतोय हे सांगायला की आम्ही मदत करतो. पण ते बिचारे खूपच घाबरले होते."

"बरं, बरं. पण कसं बाहेर काढायचा त्यांना? माझ्याकडे दोरी नाहीये."

गानू अण्णांना काय चालू होते ते कळतंच नव्हते. भांबाळलेल्या अवस्थेत नुसतेच गौतमकडे बघत होते. 

"गानू अण्णा, घाबरू नाकात हां. मी काढतो बाहेर तुम्हाला."

गौतमने सापांना विचारलं, "कसं करायचं?"

एक साप म्हणाला, "हा साप माझ्या शेपटाला गाठ घालेल. आणि तू आम्हाला आत सोड, विहिरीत. गणू अण्णांना सांग शेपूट पकडायला. आणि तू वर ओढ आम्हाला."

"अरे तुम्हाला जमेल का? अंग दुखेल ना."

"नाही, तू काळजी नको करु. आम्ही लवचिक असतो." दुसरा साप म्हणाला.

"गणू अण्णा, मी सापांची दोरी करून खाली सोडतो. तुम्ही त्यांना पकडून वर या. बिनविषारी साप आहेत. चावणार नाहीत. घाबरू नका."

गणू अण्णा मनातून जाम घाबरले होते. "राम राम, राम राम" करत सापांना पकडू लागले. "गणू अण्णा, साप काही भूत आहेत का! राम राम काय करताय!" गौतम हसायला लागला. 

कसे-बसे वर आले गणू अण्णा. पायाला लागलं होतं खूप. गौतमने त्याच्या शाळेच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी दिलं. भीती कमी झाल्यावर गौतमला म्हणाले, "गौतम, तू खरंच हुशार आणि धीट आहेस. सापांच्या मदतीने मला बाहेर काढलंस! तू बरोबर म्हणाला होतास. साप खरंच आपले मित्र आहेत. आपण उगाच त्यांना घाबरतो!"

"पटलं ना तुम्हाला! मग झालं तर! चला आता डॉक्टर कडे जाऊयात. तुमच्या पायाला औषध लावायला पाहिजे."

असं म्हणत गौतम गणू अण्णांना घेऊन गेला. दोघे साप पण आपापल्या कामास निघून गेले. 

No comments:

Post a Comment